Ad will apear here
Next
तुम्हाला ‘एसआयपी’बद्दल माहिती आहे?
शेअर बाजाराची फारशी माहिती नसतानाही तुलनेने कमी जोखीम घेऊन बँकेतील गुंतवणुकीपेक्षा जास्त फायदा मिळवायचा असेल, तर त्यासाठी उत्तम मार्ग म्हणजे एसआयपी अर्थात सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. ‘समृद्धीची वाट’ या सदरात आज पाहू या ‘एसआयपी’बद्दल... 
......
आजकाल बहुतेक गुंतवणूक सल्लागार ‘एसआयपी’द्वारे म्युच्युअल फंडांत गुंतवणूक सुरू करण्याचा सल्ला देत असल्याचे दिसून येते. इतकेच नव्हे, तर वर्तमानपत्रात, टीव्हीवर याबाबतच्या जाहिराती वरचेवर दिसून येतात; पण सामान्य गुंतवणूकदारास याबाबत पुरेशी माहिती असतेच असे नाही. किंबहुना बहुतेक जण याबाबत अनभिज्ञच असल्याचे दिसून येते. म्हणूनच आज आपण त्याबद्दलची माहिती घेऊ..

एसआयपी म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. ठराविक कालावधीने (वारंवारिता) एक ठराविक रक्कम आपण निवडलेल्या म्युच्युअल फंडाच्या योजनेत ठराविक कालावधीसाठी अथवा आपणास हवे तोपर्यंत गुंतविणे, म्हणजे एसआयपी. बहुतांश गुंतवणूकदारांना ही वारंवारिता (फ्रिक्वेन्सी) एका महिन्याची असणे सोयीस्कर वाटते. एकूण कालावधी दोन, तीन, पाच, सात वर्षे असा ठेवला जातो. हा एकूण कालावधी आपल्या गरजेनुसार कितीही असू शकतो; मात्र फ्रिक्वेन्सी तिमाही, सहामाही, वार्षिकसुद्धा ठेवता येते. एकदा आपला कालावधी निश्चित झाला, की संबंधित म्युच्युअल फंडाच्या अर्जासोबत आपल्या बँकेत दरमहा ठरविलेली रक्कम नावे टाकण्यासाठी म्युच्युअल फंडाच्या नावाने ईसीएस फॉर्म भरून द्यावा लागतो. तसेच सुरुवातीच्या गुंतवणुकीचा चेक द्यावा लागतो. आपण दर महिन्याची एक, पाच, १०, १५, २०, २५ यापैकी आपल्याला सोयीस्कर अशी कोणतीही एक तारीख निवडू शकतो. म्युच्युअल फंडानुसार या तारखा थोड्याफार वेगळ्या असू शकतात. पुढील महिन्यापासून आपण निवडलेल्या तारखेला ठरविलेली रक्कम आपल्या बँक खात्यातून जमा होते.

एसआयपी गुंतवणूक फायदेशीर कशी ठरते, हे एका उदाहरणावरून पाहू. समीरने दरमहा पाच हजार रुपये एचडीएफसी म्युच्युअल फंडाच्या इक्विटी फंडात पुढील पाच वर्षांसाठी गुंतविण्यासाठी एसआयपी नुकतीच सुरू केली आहे. त्याचा पहिला चेक पाच तारखेला जमा झाला आहे. या फंडाची त्या दिवशीची नेट असेट व्हॅल्यू (एनएव्ही) ६४५ रुपये असली, तर त्याच्या नावावर पाच हजार भागिले ६४५ म्हणजेच ७.७५ युनिट जमा होतील. पुढील महिन्यात पाच तारखेला पाच हजार रुपये भरले गेल्यानंतर त्या वेळी एनएव्ही ६८० रुपये असेल, तर त्याच्या नावावर पाच हजार भागिले ६८० म्हणजेच ७.३५ युनिट जमा होतील. त्यापुढील महिन्यात शेअर बाजार पडला व एनएव्ही ६३५ रुपये झाली, तर पाच हजार भागिले ६३५ म्हणजे ७.९१ युनिट जमा होतील. त्यापुढे दरमहा पाच हजार रुपये फंडात जमा होतील आणि दर महिन्याच्या पाच तारखेला एचडीएफसी म्युच्युअल फंडाच्या इक्विटी फंडाच्या युनिटची जी किंमत असेल, त्यानुसार युनिट्स समीरच्या खात्यात जमा होतील. बाजारातील चढ-उतार विचारात घेता दर महिन्याला कमी-अधिक युनिट समीरच्या नावावर जमा होत राहतील. समजा पुढील पाच वर्षांत त्याच्या नावावर एकूण ३३९ युनिट्स जमा झाले आणि त्या वेळचा प्रति युनिटचा भाव १३४४ रुपये असेल, तर त्याची बाजारातील किंमत (मार्केट व्हॅल्यू) ३३९ गुणिले १३४४ म्हणजेच चार लाख ५५ हजार ६१६ रुपये होईल. यात परताव्याचा दर १६ टक्के इतका असेल आणि तो प्रचलित बँक रिटर्नच्या तुलनेत खूपच चांगला असेल. अर्थात, एक गोष्ट आहे, की यामध्ये नेमका किती रिटर्न मिळेल हे खात्रीशीर सांगता येत नाही. मिळणारा रिटर्न हा त्या कालावधीतील बाजारातील चढ-उतार व आपण जेव्हा पैसे काढणार आहात, त्या वेळचे युनिटचे मूल्य (एनएव्ही) यावर अवलंबून असेल.

असे असले तरी, आपण बाजार पडला असेल अशा वेळी रक्कम न काढता बाजार तेजीत असताना रक्कम काढल्यास नक्कीच फायदा होईल. आपल्याला रकमेची तातडीची गरज असेल, तर संपूर्ण रक्कम न काढता, हवी तेवढीच रक्कम काढून संभाव्य नुकसान टाळता येते. ज्या गुंतवणुकदारांना नियमित गुंतवणूक करावयाची आहे आणि शेअर बाजाराची माहिती नाही अशा गुंतवणूकदारांनी ‘एसआयपी’पासून सुरुवात करावी.

सुधाकर कुलकर्णी 
(लेखक पुण्यातील सर्टिफाइड फायनान्शियल प्लॅनर आहेत.)

(शेअर बाजार, तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. ‘समृद्धीची वाट’ या सदराचा उद्देश वाचकांना गुंतवणुकीसंदर्भातील अशा विविध बाबींची माहिती करून देऊन दिशा दाखवणे हा आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवरच करावी. त्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZUZCH
Similar Posts
म्युच्युअल फंड – गुंतवणुकीचा किफायतशीर पर्याय म्युच्युअल फंडांची चर्चा अलीकडे सर्रास आपल्या कानावर पडते. त्यातील गुंतवणूक वाढली असल्याचे अहवालही आपल्याला वाचायला मिळतात मात्र सर्वसामान्य गुंतवणूकदारांना या पर्यायाबद्दल सहज समजेल अशी माहिती मिळत नसल्याने त्यांचे याकडे वळण्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे. म्हणूनच ‘समृद्धीची वाट’ या सदरात आपण म्युच्युअल
निवृत्तीनंतरचा आधार - एनपीएस वाढते आयुर्मान, विभक्त कुटुंब पद्धती व झपाट्याने बदलत जाणारे राहणीमान यामुळे निवृत्तीनंतरचे ज्येष्ठ नागरिकांचे जीवनमान हा एक चिंतेचा विषय होऊन गेला आहे. या दृष्टिकोनातून आजच्या तरुण पिढीला आपल्या निवृत्तीनंतरची काळजी वेळीच घेणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच यासाठीच्या ‘एनपीएस’ या अगदी योग्य अशा पर्यायाची माहिती घेऊ या
‘एनपीएस’बाबत आणखी काही... एनपीएस अर्थात नॅशनल पेन्शन सिस्टीम या विषयावरील मागील लेखात आपण त्याबाबतची प्राथमिक माहिती घेतली. ‘समृद्धीची वाट’ या सदरात आज आपण या योजनेच्या आणखी काही महत्त्वाच्या बाबींची माहिती घेऊ.
एसडब्ल्यूपी म्हणजे काय? मागील लेखात आपण म्युच्युअल फंड गुंतवणुकीच्या एसआयपी या पर्यायाबाबत माहिती घेतली. असाच आणखी एक पर्याय आहे ‘एसडब्ल्यूपी.’ ‘समृद्धीची वाट’ या सदरात आज त्याची माहिती घेऊ या...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language